Thursday, December 4, 2008

श्रीभगवतगीता

कोणताही ग्रंथ वाचायला घ्या; त्यात विषय कोणता? वाचण्याचा अधिकार कोणाला आणि तो वाचल्याचे फळ काय हे सर्व पाहण्याची आवश्यकता असते.

गीतेचा विषय कोणता? गीताच त्याचे उत्तर देते की, 'गुह्यतमं शास्त्रम्'. भगवान श्रीकृष्ण सांगतात की गीता शास्त्र आहे आणि ते सुद्धा गुह्यतम शास्त्र.

चंद्राच्या मापाप्रमाणे विज्ञानाचे माप देखिल रोज बदलत असते. प्लेटो म्हणतो की विज्ञान हे ओपिनियन (अभिप्राय) आहे. एके काळी अणु जड गणला जात असे. आज अणु चेतन गणला जातो. एके काळी Heart Attack आला तर हलायची देखिल मनाई होती, पण आज थोडे थोडे चालण्याची आग्रहपूर्वक सूचना करण्यात येते. तात्पर्य म्हणजे विज्ञानाचे अभिप्राय सतत बदलत असतात. ज्याचे सिद्धांत भूत, वर्तमान आणि भविष्यामध्ये कधीच बदलत नाहीत त्याचे नाव शास्त्र. गीतेचे सिद्धांत पाच हजार वर्षापूर्वी जेव्हढे प्रेरणादायी होते तेव्हढेच आजही आहेत आणि पाच हजार वर्षानंतरही राहणार आहेत. म्हणूनच ती शास्त्र आहे.

शिवाय गीताकार सांगतात की हे गुह्यतम् शास्त्र आहे. ह्यात जीव, जगत आणि जगदीश ह्यांच्यातील संबंधांचे रहस्य आहे. असा हा महान ग्रंथ आपल्या सारख्या अकर्मियांच्या हातात आला आहे म्हणूनच त्याला किंमत राहिलेली नाही. असा ग्रंथ दुसऱ्या देशात असता तर त्याचा केव्हढा सन्मान झाला असता! युरोपात बायबल येत नाही असा क्वचितच कोणी असेल पण आपल्या येथे गीता येणारे क्वचितच पाहायला मिळतील. कित्येक जण तर गीतेवर चंदनाचे थरावर थर चढवीत असतात आणि गौरव होत असेल तर सांगतात की आम्ही गीतेला मानतो. पण ह्या रीतीने गीतेला मानणारा भगवंताला आवडत नाही. गीतेला मानणारा पण गीतेने सांगितलेले न मानणारा काय कामाचा!!

गीता कोणाला कळते? गीता सांकेतिक शब्दात सांगितलेली आहे. ती सांकेतिक भाषा समजत नसेल तर कितीही उच्च शालेय शिक्षण घेतलेल्याला देखिल गीता कळणार नाही. उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास, एक लहानगे मूल खूप रडत होते. त्याचे रडणे थांबविण्यासाठी एका खूप शिकलेल्या प्रोफेसरने खूप प्रयत्न केले पण त्या मुलाचे रडणे काही थांबेना. इतक्यात त्या मुलाची आई आली, तिने मुलाला उचलून घेतले आणि ती टा..टा हू .. हू असे काहीबाही बोलू लागली. ते ऎकताच मुलाचे रडणे थांबले आणि ते हसू लागले. हे पाहून त्या प्रोफेसरने त्या बाईला विचारले की ह्या टा..टा हू .. हू चा अर्थ काय? त्यावेळी त्या बाईने सांगितले की ह्याचा अर्थ समजावता येणार नाही. माझा मुलगा बनून जो येईल त्यालाच तो समजेल.

हीच गोष्ट गीतेची आहे. आपण गीतेला माता समजून, तिचा पुत्र बनून जर गेलो तरच गीता आपल्याला समजेल. अन्यथा नाही. म्हणूनच लौकिक अर्थाने अडाणी असलेले तुकाराम महाराज आत्मविश्वासाने सांगतात, "वेदांचा तो अर्थ आम्हासी ठाव । इतरांनी वहावा भार माथा ॥"

गीतेचे फळ काय?

आजच्या भौतिकवादाच्या काळात फळ दाखविल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. आता जर एखादी जाहीरात आली की गीता येत असेल तर नोकरी मिळेल अथवा पगारवाढ मिळेल तर सर्वच गीता वाचू लागतील. भगवान श्रीकृष्णांनींच गीता पठणाचे फळ सांगितले आहे आणि ते म्हणजे "जो गीता वाचतो तो बुद्धीमान होतो".

ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे, जो परिक्षेत अधिक मार्क्स मिळवतो त्याला गीता बुद्धीमान नाही म्हणत. मी कोण आहे? कोणाचा आहे? कशासाठी आलो आहे? ह्याची जाणीव म्हणजे बुद्धी. "मी भगवंताचा आहे. त्याने मला जन्माला घातले आहे. तोच मला सांभाळतो आहे. मेल्यावर तोच मला घेऊन जाणार आहे. मी त्याचा आहे" हे ज्यांच्या जीवनात / बुद्धीत दृढ झाले तो गीतेच्या दृष्टीने बुद्धीमान. गीतेचे अध्ययन आपल्यात ही जाणीव निर्माण करते, दृढ करते.

गीतेचा अधिकारी कोण?

काय म्हातारी माणसे गीतेची अधिकारी आहेत? काय संस्कृत कळणारेच गीतेचे अधिकारी आहेत? काय केवळ संन्यासीच गीतेचे अधिकारी आहेत? नाही. प्रत्येक मनुष्य गीतेचा अधिकारी आहे. उन्नत जीवनाचे चिंतन करणारा प्रत्येक मानव गीतेचा अधिकारी आहे. तारुण्यातच गीता वाचण्यास सुरुवात केली पाहिजे कारण गीता जीवन समजावणारा गंथ आहे.

गीतेचा अधिकारी तो जो अर्जुनाप्रमाणे अनघ आहे, निष्पाप आहे. आपणही अर्जुनाप्रमाणे अर्थपावित्र्य आणि कामपावित्र्य आपल्यात आणून तसेच भगवंताच्या कामात स्वतःला साधन बनवून पवित्र बनू शकतो. गीता समजण्यास पात्र बनू शकतो.

पाणी शिंपडून अथवा पाण्याने धुऊन स्वच्छता येते, पावित्र्य येत नाही. स्वच्छता आणि पावित्र्य ह्यात फार मोठा फरक आहे. वेश्येची साडी स्वच्छ असेल पण ती पवित्र असत नाही. पण आईची साडी फाटलेली असेल, ठिगळे लावलेली असली तरी पवित्र आहे कारण आई माझ्यासाठी झिजलेली असते. असेच भगवंतासाठी झिजून, भगवंताचे काम करून आपणही पवित्र बनू शकतो. सर्वांना सुखी करण्याचे काम म्हणजे भगवंताचे काम, सर्वांची सेवा म्हणजे भगवंताचे काम, सर्वांना प्रभू सान्निध्याची, प्रभू सामिप्याची जाणीव करून देणे हे भगवंताचे काम आहे. हे काम करून आपणही झिजू तर पवित्र, निष्पाप बनत जाऊ आणि अर्जुनाप्रमाणे गीतेचे अधिकारी बनू.